मोठ्या अपघाताच्या वेळची आपली मनस्थिती

कालच विमानाच्या मोठ्या अपघाताची बातमी आली. असे काही अकस्मात खबर वाचली की अनेक भावना मनात दाटून येतात. काही सुचत नाही. काही वेळेला असं वाटतं की काहीच करू नये बसून राहावं, रडू येतं. आपलं रोजचं रुटीन सुद्धा विस्कळीत होतं. तुम्हालाही असं काही होतंय का? असं होणं अगदी स्वाभाविक आहे. आजच्या AI च्या जमान्यात आपल्या भावना अजून शाबूत आहेत आणि आपण माणूस आहोत त्याची प्रचिती येते. जरा खोलात जाऊन आपल्या या भावनांचा आढावा घेऊया. रुटीन विस्कळीत होणं, खूप निराश वाटणं, रोजचं आयुष्य विस्कळीत होणं ते जगणं पण कठीण वाटू लागणं; खाणं पिणं कशातच आनंद न वाटणं, हे सगळं होऊ शकतं. कारण तुम्ही या घटनेमुळे दुःखी आहात. अनेकांच्या दुःखात तुम्ही सामील आहात. या गोष्टीचा तुम्ही स्वीकार करा. जमत असल्यास तुमच्यासारख्या आणखीन काही लोकांमध्ये बसून प्रार्थना करा. एकमेकांच्या दुःखात सहभागी व्हा.

अशा वेळेला काही लोकांना खूप राग येतो. असं वाटतं की एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली असून सुद्धा अशा काही घटना होऊच कशा शकतात? अशी दुर्घटना होउच कशी शकते! हे किती भयानक आहे! अख्खं भारत हे कधीच विसरू शकणार नाही. किती असहाय्य वाटतं! अशा भावनांबद्दल बोललंच पाहिजे. असं वाटतं की कोणामुळे घडलं, का घडलं, याची पाळे मुळे शोधून काढावी आणि ज्यांच्यामुळे घडले त्यांना शिक्षा द्यावी, वगैरे. या घटनेबद्दल जे वाटतं ते एकमेकांशी बोलत राहा. दाबून ठेवू नका. ‘डू नॉट बॉटल अप’ हे वाटणे खूप स्वाभाविक आहे.
या भावनांच्या गोंधळा मध्ये कदाचित काही अपराधीपणाची भावना सुद्धा असू शकेल. तिथे ती लोकं मेली, आणि मी इथे मजेत!!! ह्याला सायकॉलॉजीच्या भाषेत ‘Survivor Guilt’ म्हणतात. खोलात जाऊन विचार केला तर आपण स्वतः ला सांगू शकू की यामध्ये माझी तर काही चूक नाहीये. परंतु मी ज्या परिस्थितीमध्ये आहे, ती किती सुरक्षित आहे ! त्यासाठी मी देवाचे, या विश्वाचे आभार मानावे.

काही लोकांना या आकस्मातामुळे विमानाच्या प्रवासाची भीती वाटू लागणे पण साहजिक आहे. पॅनिक अटॅक येणे असे पण होऊ शकतं. अशा वेळेला सतत समाचार व अपडेट्स घेणे बंद करावेत. किती विमानांचा अपघात खरोखर होतो, फॅक्टस् चेक करावेत. अवास्तविक कल्पनांमध्ये रमू नये. हे तुमच्या बरोबर होण्याचा चान्स किती आहे याचा नक्कीच विचार करावा.

या सगळ्या भावना फार गुंतागुंतीच्या असतात. जेव्हा तुम्ही अशा काही भावनांमुळे दडपून जाता, किंवा तुम्हाला दडपण येतं , या भावना तुमच्यावर हावी होतात, तेव्हा एवढे जरूर करा. ज्याला सायकॉलॉजीच्या भाषेत ग्राऊंडींग टेक्निक म्हणतात. आजूबाजूच्या पाच गोष्टींचे निरीक्षण करणे व मोठ्याने बोलणे, उदाहरणार्थ, कपाट, पेन, टेबल, खुर्ची, सोफा, वगैरे.
आजूबाजूच्या चार गोष्टी, ज्यांना तुम्ही स्पर्श करू शकता, त्यांना स्पर्श करणे. आपल्याला ऐकू येणाऱ्या तीन आवाजांचे निरीक्षण करणे. दोन गोष्टी चा गंध घेणे. एक गोष्टीचा स्वाद घेणे .
पाच, चार, तीन, दोन, एक, हे तुम्हाला वास्तविकतेकडे नेण्यासाठी उपयुक्त होईल. याला ‘Bringing you here and Now’ असे म्हणतात. दुसरी टेक्निक म्हणजे खोल श्वास घेणे आणि हळूहळू उच्छवास करणे. मन कशात तरी गुंतवण्याचा प्रयत्न करणे, पण भावना नकारू नये. आपण सर्व या दुःखात सहभागी आहोत आणि यासाठी विश्वप्रार्थना करणे.

सर्वे सुखी न: संतो …

1 thought on “मोठ्या अपघाताच्या वेळची आपली मनस्थिती”

  1. धन्यवाद .
    असंच ‘तरीही गगन ठेंगणे हे १४ जून , लोकसत्तातलं संपादकीय माहितीत भर घालणारं होतं . त्यांनी म्हटलंय भारतात वर्षभरात रस्त्यावरच्या अपघातात जितकी माणसं मरतात तितकी गेल्या ५० वर्षात जगभरातील एकूण विमान अपघातांमध्ये मिळूनही दगावलेली नाहीत .
    एका देशातीह विमान अपघाताचा धडा सर्व देश घेतात . या उद्योगाचं ध्येय शून्य विमान अपघात असं आहे .
    दुर्घटनांतून शिकत, सुधारत हवाई क्षेत्र विस्तारतच जाणार आहे इ .
    अपघातग्रस्त कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत पण अकारण विमान प्रवासाची भीती बाळगण्याचं कारण नाही असं सांगणारा अग्रलेख . बहुतेक गिरीश कुबेर यांचा असावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top